अटकेतील आरोपींची संख्या झाली पाच : तपासात यश
यावल – शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत मास्टर माईंड मुकेश प्रकाश भालेरावसह चार आरोपींना अटक झाली असतानाच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाचवा आरोपी रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी (41, श्रीराम नगर, भुसावळ) याच्या रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या आहेत. दरोड्याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे.
यावलमधील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (32, रा. रामनगर ता.कन्नड, जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई), यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल), चंद्रकांत उर्फ विकी सोमनाथ चाले (लोणारी, रा.मोहित नगर, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली होती तर शनिवारी मुकेश भालेराव (भुसावळ) याच्या अटकेनंतर रविवारी पहाटे रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी (41, श्रीराम नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. एकूण अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली असून या गुन्ह्यात सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्यापाडा, ता.चोपडा) हा पोलिसांना वॉण्टेड आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिर्हाडे आदींच्या पथकाने आरोपीच्या भुसावळातील श्रीराम नगर भागातून मुसक्या आवळल्या. आरोपीला एएसआय मुजफ्फर खान समशेर खान यांच्या ताब्यात देण्यात आले.



