भुसावळात मुख्याध्यापिकेकडे चोरी : दोन लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला : तीन संशयीत जाळ्यात ;

भुसावळ –
शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स भागातील रहिवासी असलेल्या मुख्याध्यापिकेच्या बंद घरातून चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवला होता. गुरुवार, 15 रोजी ही घटना घडली होती.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयीतांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षा तरन्नुम युनूस खान या विवाहिता नशिराबादच्या उर्दू शाळा क्रमांक दोनमध्ये मुख्याध्यापक आहेत. गुरुवार, 15 रोजी त्या कुटुंबासह अमरावती येथे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत कपाटातील जुना लॅपटॉप, सोन्याची पोत, अंगठ्या तसेच कानातले झुमके मिळून सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज लांबवला. खान या गावावरून परत आल्यानंतर शुक्रवारी रात्री चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. शनिवारी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व कर्मचार्‍यांनी घराची पाहणी केली. चोरी प्रकरणी मुनीर खान लतीफ खान यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चोरी प्रकरणी तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून लवकरच गुन्हा उघडकीस येईल, असे उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.