कचगावात पाच डेंग्यू रुग्ण आढळले :

कचगावात पाच डेंग्यू रुग्ण आढळले : आरोग्य यंत्रणा हादरली ;
कजगाव – भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पाच डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सबंधित प्रशासनाने मात्र ह्या गंभीर घटनेवर चुप्पी साधल्याचे दिसून येते.
कजगाव येथिल रहिवासी व माजी ग्रा प सदस्य शफी मणियार यांची सहा वर्षीय नात रीदा मोहसीन मणियार व तीन वर्षीय नातू अली मोहसीन मणियार ह्या दोघा बालकांना डेंग्यूची लागण झाली आहे. जीन परिसरातील ईश्वर हिरे यांची नऊ वर्षीय मुलगी तेजश्री ईश्वर हिरे हिला देखील डेंग्यू ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर अकरा वर्षीय जागृती भोलेनाथ भोई व वंदना संदीप पाटील यांना देखील डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे.
सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेंग्यू रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हदरलेली आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना सुरू झाला मात्र कजगाव प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वतीने व स्थानिक प्रशासनाने कुठल्याही उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही. डेंग्यू सारख्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढत्या विविध आजारावर त्वरित नियंत्रण ठेवून डेंग्यू सारख्या गंभीर बाबींकडे त्वरित लक्ष घालावे अशी मागणी जनसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान डेंग्यू चे पाच रुग्ण आढळून आल्याने गावात आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. तब्बल पाच रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने विविध आजार पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य त्या सूचना संबंधितांना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे.

डेंग्यू रुग्णांच्या बाबतीत त्वरित दखल घेऊन आरोग्य सेवा द्या – अपर्णा पाटील
सध्या डेंग्यू प्रतिरोधक महिना सुरू असल्याने गप्पी मासे सोडणे, रक्ताचे नमुने घेणे, लोकांना आरोग्य विषयी माहिती देणे व विविध उपाय योजना राबवित असतो. तसेच ह्या डेंग्यू रुग्णांच्या बाबतीत त्वरित दखल घेऊन तशी कारवाई करण्याच्या सूचना संबधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात येतील. अशी प्रतिक्रिया अर्पणा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यांनी दिली आहे.