भुसावळ –
जामनेर रोडवर असले गजानन महाराज मंदिरा समोर अंधाराचा फायदा घेत एका तरुणाची दगडाने ठेचुन व धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याची घटना आज शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली. सदर वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली . दगडाने ठेचून चेहरा विद्रूप झाल्याने घटना घडल्यापासुन सुमारे दोन ते अडीच़ तासापर्यंत मयताची ओळख पटली नव्हती. मात्र पोलिसांनी केलेल्या आवाहन नंतर नागरिकांच्या मदतीने ओळख पटविण्याचे प्रयत्न केले असता मयताचे कुटुंबियांना माहिती मिळाली व कुटुंबियांनी बाजारपेठ पोलिस स्टेशन गाठले. तेव्हा त्याचे आईने व पत्नीने ओळख पटविली आहे.
शहरातील श्रद्धानगर भागातील रहिवासी ज्ञानदेव भगत( वय 35 वर्ष ) असे मयताचे नाव निष्पन्न झाले असून या प्रकरणी तीन संशयीतांचे नाव पोलिसांसमोर आले असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले .
घटना ही पहाटेच्या वेळी घडलेली असावी.असे प्रथमदर्शी निर्दशनात आले असून तपास अंतर्गत मयत कुठे व कोणा सोबत होता ? कोणा कोणाच्या संपर्कात व काय बोलणे झाले आहे ? ह्या दिशेने तपास सुरु असून त्या तीन संशयितांचे शोध सुरु आहे.
पोलिस पथकासह एलसीबी पथक तपासाच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. अवघ्या काही तासात संशयितांना अटक करण्यात येईल.असा विश्वास व्यक्त करीत तपास सुरु आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रसिद्धि माध्यमांशी बोलतांना दिली.



