भुसावळ

शहरातील खडका रोड भागातील रहिवासी शेख अयाज हे गेल्या महिन्यात आपल्या परीवारासह पुण्याला गेले व त्याच दरम्यान राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आल्याने शेख अयाज हे पुण्यात अडकले. त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत शहरातील काहींनी शेख यांच्या घरातील सर्व साहित्य परस्पर लंपास करीत संपूर्ण घर जमीनदोस्त केले. या प्रकरणी शेख अयाज यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मे महिन्यात घर तोडण्यात आल्याचा आरोप
शहरातील खडका रोड भागातील मोहम्मदी नगरातील रहिवासी शेख अयाज शेख अय्युब (32) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सासू पुणे येथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने ते आपल्या पत्नीसह मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे गेले होते. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने शेख आपल्या परीवारासह पुण्यातच अडकून पडले. यादरम्यान 28 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घराशेजारील रहिवासी फिरोज व रुक्साना शेख यांनी शेख अयाज यांना घराची तोडफोड केल्याबद्दल फोनवरून माहिती दिली. यावेळी शेजारी फिरोज शेख यांनी फोनवरुन माहिती दिली की, हबीब खान हमीद खान (रा. काझी प्लॉट, भुसावळ) यांनी आठ ते दहा मजूरांच्या सहाय्याने 12 ते 28 मे दरम्यान शेख अयाज यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यासह दागिने व रक्कम, फर्निचर परस्पर लंपास करून घराची तोडफोड केली. याप्रकरणी शेख अयाज यांच्या तक्रारीनुसार, हबीब खान हमीद खान यांच्याविरोधात भादंवि 244/21, 447, 448, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अयाज यांच्या तक्रारीनुसार या प्रकारात त्यांचे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करीत आहेत.


