मान्सूनपूर्व कामांना ‘महावितरण’ची बगल ; सूचना देऊनही दुरुस्ती नाहीच ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांना जून महिना सुरू झाल्यावरही सुरुवात नाही. अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी वीजतारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लॅक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो. याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे अपेक्षित आहे. वीज रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे. रोहित्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करणे. फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धातच केली जावी यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी सूचना केली होती.
ऊर्जामंत्र्याकडे तक्रार दाखल…
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी मान्सूनपूर्व कामे महावितरणने कोणत्या अधिकृत एजन्सीला काम दिले आहे अशी विचारणा केली असता अधिकारी वर्गाने उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली म्हणून शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी थेट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे.
दरवर्षी प्रमाणे भुसावळ शहरात मान्सून पूर्व कामांची सुरुवात जून महिन्यात केली जाते. अधिकारी आणि एजन्सी यांची मिलीभागत असते. पूर्ण दुरुस्ती केलीच जात नाही. एक दोन ठिकाणी काम करून संपूर्ण शहराच्या कामांचे देयके लाटण्याचा प्रयत्न असतो अशी चर्चा नागरिकांमध्ये असते.

(फोटो ) जुना सातारा भागात असलेल्या रोहित्रावर आलेल्या वेली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *