झोका खेळतांना गळफास लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू ; भुसावळातील घटना ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
झोक्याशी खेळत असताना नकळत झोक्याचा दोर गळ्याशी आवळला गेल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान नगरा जवळील भंगाळे चाळीत शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये
हनुमान नगर, भंगाळे चाळ, येथील दीपांकर प्रमोद भंगाळे (वय 11) हा चिमुकला मयत झाला आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
कांदा विक्री करणारे व्यावसायीक प्रमोद भंगाळे यांचा एकुलता एक मुलगा दीपांकर हा ताप्ती शाळेत पाचवीचे शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी वडिल कामानिमित्त बाहेर पडले तर आई देखील शेतात गेल्याने दीपांकर हा घरी झोक्याशी खेळत असताना झोक्याचा दोर त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला मात्र प्रयत्न करून त्यास बाहेर निघता न आल्याने त्याचा मृत्यू झाला. भंगाळे यांच्या घराशेजारीच त्यांचे बंधू राकेश लक्ष्मण भंगाळे राहतात. त्यांची कन्या दुपारी साडेतीन वाजता दीपांकर यास पाहण्यासाठी आली असता दीपांकर झोक्याला उलट्या अवस्थेत लटकलेला दिसल्याने तिने घरच्यांना माहिती कळवल्यानंतर तातडीने त्यास डॉक्टरांकडे नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूने नातेवाईकांनी टाहो फोडल्याने उपस्थितांनाही गहिवरून आले. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी राकेश लक्ष्मण भंगाळे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *