थकबाकी वसुलीसाठी शेतकरी कुटुंबाला घराबाहेर काढले; फायनान्स कंपनीने घराला ठोकले सील!कर्त्या मुलाच्या निधनाने आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कुटुंब आर्थिक संकटात; ग्रामस्थांच्या हस्तक्षेपानंतर घराचे कुलूप उघडले ;

भंडारा (प्रतिनिधी )-कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून खासगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी एका शेतकरी कुटुंबाला घराबाहेर काढून घराला सील ठोकल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील वाहनी येथे शुक्रवारी घडली. कुटुंबातील कर्त्या मुलाचे निधन आणि त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबावर अचानक बेघर होण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेर घराचे कुलूप उघडून कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनी येथील विष्णू कनपटे यांनी घर बांधण्यासाठी २०२३ मध्ये एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले. मात्र, तीन ते चार महिन्यांपूर्वी कुटुंबातील कर्त्या मुलाचे निधन झाले. त्यातच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला. परिणामी, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आणि कर्जाचे हप्ते थकले.

या थकबाकीच्या कारणावरून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी थेट कनपटे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर काढत घराला कुलूप लावले. एवढेच नव्हे, तर घरातील संसारोपयोगी साहित्यदेखील बाहेर काढण्यात आले. घरात लहान नातवंडे आणि वृद्ध सदस्य असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले.

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; कंपनीच्या प्रतिनिधींना जाब ; 

या घटनेची माहिती गावात पसरताच स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारत कारवाईचा निषेध केला. कर्जाची थकबाकी भरणे शक्य न झाल्यास गावातून लोकवर्गणी जमा करून रक्कम उभी करू; मात्र या कुटुंबाला घराबाहेर काढू नका, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

ग्रामस्थांच्या आक्रमक हस्तक्षेपानंतर कंपनीच्या प्रतिनिधींना माघार घ्यावी लागली. अखेर घराला लावलेले कुलूप काढण्यात आले आणि कुटुंबीयांना पुन्हा घरात राहण्याची परवानगी देण्यात आली.

सक्तीच्या कर्जवसुलीवर प्रश्नचिन्ह ; 

आधीच दुष्काळी परिस्थिती, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन आणि आर्थिक विवंचना अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे कुटुंबीयांनी दोन दिवसांची मुदत मागितली होती; मात्र ती नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता घरातील साहित्य बाहेर काढण्यात आल्याची व्यथाही कुटुंबीयांनी व्यक्त केली.

कर्जाची वसुली करताना संबंधित कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असताना, अशा प्रकारे कुटुंबाला घराबाहेर काढण्याच्या कारवाईमुळे खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची संबंधित प्रशासनाने दखल घेऊन योग्य चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.