भुसावळ (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीनिमित्त शनिवारी व्ही. एम. वाॅर्डातील श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सोहळा पार पडला. पहाटेपासूनच श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात महिला भाविकांनी फुगडी खेळीत 'विठ्ठल-विठ्ठल'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी गाभारा तसेच प्रवेशद्वार सजवण्यात आले होते. संपूर्ण मंदिरावर करण्यात आलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरात मंगलमय वातावरण दिसत हाेते. सायंकाळी निघालेल्या दिंडीत भाविकांनी ठिकठिकाणी विठू नामाचा गजर करीत दिंडीचे स्वागत केले. विठ्ठल मंदिर वॉर्ड भागात अनिल बागुल व परिवारातर्फे दिंडीचे स्वागत करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला. एकादशीच्या उपवासानिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी खास फराळाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक सेवाभावी भाविकांच्या वतिने साबुदाणा पी खिचडी, केळी आणि राजगिरा लाडूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. दिवसभर भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे कार्यक्रम पार पडले. सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. फोटोओळ- कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रुखमाई संस्थान तर्फे काढण्यात आलेल्या दिंडीचे स्वागत करतांना अनिल बागुल व परिवार....



