जळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून डॉक्टरांच्या कथित हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोराडखेडा येथे जमीन व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादातून कन्नड येथील डॉ. संजय तेली यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ८० लाख रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. हत्येनंतर मृतदेह पोत्यात भरून बिल्दी गावाजवळील बहुळा धरणात फेकल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. संजय तेली यांचा जमीन व्यवहाराशी संबंधित आर्थिक वाद सुरू होता. या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादावरून संबंधितांमध्ये बाचाबाची झाली. याचदरम्यान डॉक्टरांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. हत्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून बिल्दी गावाजवळील बहुळा धरणात फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर धरण परिसरात मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यांची चौकशी सुरू असून, जमीन व्यवहार, आर्थिक वाद आणि कथित हत्येतील सहभाग याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, डॉक्टरांच्या हत्येच्या संशयास्पद घटनेमुळे पाचोरा आणि कन्नड परिसरात खळबळ उडाली आहे. बहुळा धरणातून मृतदेह सापडतो का आणि तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



