भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील अस्वच्छता, पाणीटंचाई, बंद पथदिवे आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून भुसावळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. प्रभागांतील समस्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेषतः महिला नगरसेविकांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज पालिका सभागृहात झालेल्या या सभेत ३८ पैकी ३६ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले नगरसेवक सभेला अनुपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे होत्या. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, गटनेते युवराज लोणारी, बबलू बऱ्हाटे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजावर नाराजी आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे नागरिकांचे तसेच नगरसेवकांचे फोन उचलत नसल्याची तक्रार सभेत करण्यात आली. स्वच्छता वेळेवर होत नसल्याने लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. यावर मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी संबंधित आरोग्य निरीक्षकांना समज देत नागरिकांचे फोन स्वीकारून त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. नगरसेवक राज चौधरी यांनीही प्रभागातील मूलभूत कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शोभा इंगळे, शारदा धांडे, अर्चना सातदिवे, काजल मोरे, छाया देशमुख, सोनल महाजन, महिमा नागराणी आणि शांताबाई सुरवाडे यांनी स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे प्रश्न उपस्थित केले. टँकरला मोफत पाणी देण्याची मागणी नगरसेवक किरण कोलते यांनी खासगी टँकरचालकांकडून पाण्याची विक्री रोखण्यासाठी नागरिकांसाठीच्या टँकरला पालिकेने मोफत पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. प्रभाग क्रमांक आठमधील अस्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करून उपोषणाचा इशाराही देण्यात आला. सुजित भोळे, पटेल यांच्यासह महिला नगरसेविकांनी दिवाळीपूर्वी बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी केली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत निर्बीजीकरण पूर्ण करण्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ख्रिश्चन दफनभूमीत हँडपंप बसविण्याची मागणी शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीत पाण्याची व्यवस्था करण्यासह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका काजल मोरे यांनी केली. या दफनभूमीत जगविख्यात चित्रकार अल्बर्ट गिल यांची कबर असल्याने परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे येथे हँडपंप बसविण्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. हनुमान, दीनदयाळ नगरच्या रहिवाशांना मालकी हक्क द्या : ठाकूर नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी हनुमान नगरमधील सर्वेक्षण क्रमांक १६७/१/२ मधील १९७८ पासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे सर्वेक्षण करून पात्र नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्काची कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी केली. दीनदयाळ नगरमधील २०११ पूर्वीपासून असलेल्या सुमारे ५५० घरांपैकी २४९ घरे पात्र ठरली असून, उर्वरित घरांची प्रत्यक्ष पाहणी करून पात्रता निश्चित करावी, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय शहरात क्रांतिसूर्य महाराणा प्रताप आणि आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे पुतळे उभारण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात त्यांनी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांना स्वतंत्र निवेदने दिली. अमृत योजनेच्या रखडलेल्या कामांवर चर्चा अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे रखडल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध पालिकेने १३६ कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याची माहिती सभेत देण्यात आली. नगरसेवक गिरीश महाजन यांनी विकासकामे करताना संबंधित प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. दरम्यान, एमआय चाळ परिसरातील उर्दू हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आणि मालमत्ताधारकांना सांडपाणी कर लागू करण्याचे दोन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. अमृत १.० योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे तसेच नाला व्यवस्थापनाच्या कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवालाला मुदतवाढ देणे यांसह एकूण ३६ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सभेत ऐरणीवर आल्याने प्रशासन आता या समस्यांवर काय कार्यवाही करते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.


