माणुसकीच्या पणत्यांनी उजळली दिव्यचक्षू महिलांची दिवाळी ! माणुसकीची दिवाळी’ उपक्रमातून आनंदाची अनोखी भेट; स्नेहादीप संस्थेचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण! मात्र, हाच आनंद समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संवेदनशील प्रयत्न खानदेश अंधकल्याण संघ संचलित स्नेहादीप निराधार अंध महिला संस्थेतर्फे करण्यात आला. संस्थेच्या वतीने रेल्वे सिनिअर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेला ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमातून दिव्यचक्षू महिलांच्या जीवनात आनंदाची पणती प्रज्वलित करण्यात आली.

दिव्यचक्षू महिलांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने प्रत्येक महिलेला दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये रवा, तेल, तूप, मैदा, डाळी, साखर, गूळ, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. या भेटीमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती चौधरी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे आणि भुसावळच्या नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी चौधरी यांनी केले.

प्रास्ताविकात खानदेश अंधकल्याण संघाचे संस्थापक कार्यकर्ते संजय पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. दिव्यचक्षू महिलांसाठी उभारण्यात येत असलेल्या आश्रमाच्या बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन आर्थिक व वस्तुरूपाने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रजनीताई सावकारे यांनी दिव्यचक्षू महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद कायम राहावा, यासाठी आपण आणि आपले पती सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे यांनीही संस्थेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनांमुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले.

कार्यक्रमाची सुरुवात दिव्यचक्षू संजय बडगुजर यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. व्यासपीठावर दिव्यचक्षू प्रतिनिधी आनंदा कोल्हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात आरती चौधरी यांनी प्रमुख पाहुण्या रजनीताई सावकारे व नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे यांचे मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, “आनंद हा वाटल्याने वाढतो. म्हणूनच आम्ही दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच आमची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदमय होते. चांगल्या कार्यासाठी नेहमीच मदतीचे हात पुढे येतात, याचा प्रत्यय आज पुन्हा आला. प्रमुख पाहुण्यांनी उदार मनाने मदतीची तयारी दर्शविली, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.”

यावेळी स्नेहादीप संस्थेच्या संचालिका स्वाती नाईक, लता होसकोटे, कावेरी चौधरी यांच्यासह जयश्री दवे, मंगला पाटील, जयश्री पाटील आणि अनेक महिला उपस्थित होत्या.

दिवाळी केवळ घरातील दिवे उजळविण्याचा सण नसून, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचा उत्सव आहे, याची प्रचिती ‘माणुसकीची दिवाळी’ या उपक्रमातून आली. सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात संवेदनशीलतेची ज्योत पेटवून गेला.