भुसावळात पोलिसासाठी ३० हजारांची लाच मागणी भोवली ! खाजगी पंटर अमन सनसोये जळगाव एसीबीच्या जाळ्यात; संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी भुसावळात कारवाई केली. या प्रकरणात अमन सनसोये या खाजगी पंटराला अटक करण्यात आली असून, त्याच्या माध्यमातून लाच मागणी केल्याचा आरोप असलेल्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा एसीबीकडून शोध सुरू आहे. या कारवाईमुळे भुसावळ पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने दाखल गुन्ह्यात तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी तसेच प्रकरणात कारवाई न करण्यासाठी अमन सनसोये याच्या माध्यमातून ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने कारवाईची तयारी केली. ऑगस्ट २०२६ मध्ये भुसावळ शहरात संशयित पोलीस कर्मचारी व खाजगी पंटराविरोधात सापळा रचण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्याच कालावधीत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या आईचे निधन झाल्याने नियोजित कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सापळ्याचा संशय आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, लाच मागणीसंदर्भातील अहवाल व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे एसीबीने मंगळवारी अमन सनसोये याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच मागणी करण्यास सांगणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा एसीबीकडून कसून शोध सुरू आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याशी संबंधित या लाच प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, तपासात आणखी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.