भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव आणि वराडसीम येथे पोळा सण पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. साकेगावात मानाचे तोरण तोडण्याचा थरार, तर वराडसीम येथे तब्बल २०३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या गाव दरवाजाच्या अवघ्या तीन बाय तीन फुटांच्या खिडकीतून बैल कुदवण्याचा अनोखा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. साकेगावात तोरण तोडण्याचा थरार साकेगाव येथे गुरुवारी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मानाचे तोरण तोडण्याचा थरार अनुभवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोळा मैदानावर देवानंद कोळी यांनी, तर जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यावर समाधान कोळी यांनी पोळा फोडताच उपस्थित ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एपीआय राजेंद्र चाटे, संजय भोई, वाल्मीक सोनवणे यांच्यासह पोलिसांचे पथक तैनात होते. ग्रामपंचायत आणि पोलिस पाटील गणेश भोई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले. वराडसीममध्ये २०३ वर्षांची परंपरा कायम वराडसीम येथे पोळ्यानिमित्त गाव दरवाजाच्या अवघ्या ३ बाय ३ फुटांच्या खिडकीतून बैल कुदवण्याचा अनोखा पारंपरिक सोहळा यंदाही उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक परंपरेला तब्बल २०३ वर्षांचा वारसा असल्याने हा थरार पाहण्यासाठी वराडसीमसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खिडकीतून बैल कुदताच उपस्थितांनी जल्लोष करत या पारंपरिक सोहळ्याला दाद दिली. यंदा शेतकरी विकास पाटील यांच्या बैलाला खिडकीतून कुदवण्याचा पहिला मान मिळाला. त्यानंतर शरद चौधरी यांच्या बैलाने दुसऱ्या क्रमांकाने, तर कुमार नामदेव पाटील यांच्या बैलाने तिसऱ्या क्रमांकाने खिडकीतून उडी घेत हा पारंपरिक सोहळा पूर्ण केला. पोळा उत्सवादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने भुसावळ तालुका पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामस्थांनीही उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. फोटो : ३ बाय ३ फुटांच्या खिडकीतून सर्वप्रथम कुदवण्यात आलेला शेतकरी विकास पाटील यांचा बैल.



