भुसावळ खुनाने हादरले ; रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूचे वार करून निर्घुण हत्या ;पाटीलमळा परिसरातील धक्कादायक घटना; अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील पाटीलमळा परिसरात गुरुवारी (दि. १०) रात्री ८ वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात  आल्याची धक्कादायक घटना घडली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समतानगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील एका अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वादातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार सोनवणे हे भुसावळ रेल्वे विभागात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवारी रात्री ते परिचिताची दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएच १४०५ घेऊन पाटील मळा परिसरातून जात असताना त्यांचा एका अल्पवयीन संशयितासोबत काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयिताने तुषार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस तसेच पाठीवर चाकूने सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुषार यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तसेच पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.

दरम्यान, पोळा सण भुसावळ शहर व परिसरात उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर रात्री घडलेल्या या निघृण हत्येच्या घटनेने शहरातील शांततेला गालबोट लागले आहे. हत्येमागील नेमके कारण काय, या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत बाजारपेठ पोलीस तपास करीत आहेत.