पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. या घटनेत मयूर दुर्वास पाटील याच्या पोटात चाकू खुपसल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळासखेडे बु. शिवारातील रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून मयूर पाटील आणि अंकुश नेहरू पाटील यांच्यात वाद झाला. यावेळी अंकुश पाटील याने त्याच्या पँटच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयूरच्या पोटात खुपसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मयूरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५, व्यवसाय शेती, रा. पळासखेडे बु.) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अंकुश नेहरू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी अंकुश नेहरू पाटील हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत. घटनेनंतर पळासखेडे बु. परिसरात शांतता असून पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.


