राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरला छावणीचे स्वरूप!ध्वजारोहण सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांची रंगीत तालीम; शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ;

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : राष्ट्रपतींच्या शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शहरातील तेली गल्ली, कुशावर्त तीर्थ तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध ठिकाणी पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, सुरक्षेच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रंगीत तालीम पार पडली. यापूर्वी राष्ट्रपतींच्या वाहनांच्या ताफ्याचीही रंगीत तालीम घेण्यात आली होती.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शुक्रवारपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सुरक्षेचे अत्यंत कडक नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक प्रवेशद्वारावर आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा पहारा राहणार आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी आवश्यक पास मिळविण्याकरिता अनेकांकडून प्रयत्न आणि विनवण्या सुरू असल्याचेही दिसून येत आहे.

दरम्यान, कुंभमेळा प्रशासन तसेच नगरपालिका अधिकारी शहरात वारंवार भेटी देऊन स्वच्छता, परिसराची सजावट आणि इतर मूलभूत व्यवस्थांचा आढावा घेत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारीला वेग आला असला, तरी या नियोजन प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

एकूणच राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नगरपालिका यांची धावपळ सुरू असून, ध्वजारोहण सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.