पोखरी तांडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न; ‘भक्तीनाद’च्या सुरांनी अवघी पोखरी नगरी वैष्णवांच्या आनंदात न्हाली..!

धरणगाव/पोखरी (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पोखरी येथील श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला यंदाचा भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव, भक्तिमय सुरांची मैफिल अत्यंत मंगलमय,शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री गुरुपद परिसर आणि गुरुसुमंतजी सखाराम दरबार परिसरामध्ये अखंड हरिनामाचा गजर आणि भक्तीचा मळा फुलला होता.कलावंत तुषार वाघुळदे प्रस्तुत 'भक्तीनाद' भजन संध्या ग्रुपतर्फे स्वर सोहळा कार्यक्रम झाला..सोहळ्याची सुरुवात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सुरांच्या त्रिवेणी संगमाने झाली. जळगाव येथील प्रसिद्ध "भक्तीनाद" भजन संध्या ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या भजने,अभंग आणि गवळणींनी संपूर्ण परिसराला पंढरीचे रूप दिले होते. रात्री ९ ते १२ या वेळेत रंगलेल्या या सुरांच्या मैफिलीत गायक निलेश पाटील, ग्रुपचे प्रमुख व प्रसिद्ध निवेदक-निरुपणकार तुषार वाघुळदे, गायिका जागृती इंगळे आणि सहकलावंत प्रवीण पाटील यांनी आपल्या अवीट सुरांनी भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले. गवळणींच्या सादरीकरणावर भाविक तर तल्लीन होऊन नृत्यात दंग झाले होते.गुरुवारी मध्यरात्री ठीक १२ वाजता टाळ-मृदंगाचा गजर, शंखनाद आणि 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,भगवान गोपालकृष्ण की जय ,जय श्रीकृष्ण च्या जयघोषात प्रभू श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी बालकृष्णाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या परम पावन प्रसंगी विश्वकल्याणासाठी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा' या मंत्राचा १०८ आहुतींचा महायज्ञ अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला. यज्ञकुंडातून निघणाऱ्या पवित्र लहरींनी संपूर्ण आश्रम परिसर अधिकच चैतन्यमय झाला होता.. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी पंचक्रोशीतील  भाविक वर्ग सहकुटुंब उपस्थित होते.संस्थांचे प्रमुख प.पु.रामदादा यांनी ही जन्माष्टमी व विविध सण उत्सवाबद्दल विवेचन केले.त्यांनी कलावंत व भक्तीनाद ग्रुपचे प्रमुख,पत्रकार तुषार वाघुळदे यांचे विशेष कौतुक केले,त्यांच्या हातून निस्वार्थपणे चांगले कार्य होत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि उपस्थित कलावंतांचे कौतुक केले.सोहळ्याची सांगता झाल्यानंतर सर्व उपस्थित वैष्णवांनी प्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि पोखरी ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अतिशय शिस्तबद्ध, देखण्या आणि भक्तीने ओतप्रोत भरलेल्या या दिव्य सोहळ्याची प्रचिती घेऊन भाविक तृप्त मनाने आपापल्या घरी परतले.