भुसावळ, दि. ५ सप्टेंबर २०२६ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी आदतन गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नशिराबाद व भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दोन आदतन गुन्हेगारांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानबद्ध करण्यात आलेल्यांमध्ये नशिराबाद शहरातील ख्वाजा नगर येथील शोएब शेख गुलाम नबी उर्फ शोएब बिल्डर (३५) आणि भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नगर परिसरातील सम्राटकुमार सुरेश बनसोडे (३७) यांचा समावेश आहे. शोएब बिल्डरविरुद्ध सात गंभीर गुन्हे पोलीस सूत्रांनुसार, सन २०२१ ते २०२६ या कालावधीत शोएब बिल्डरविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, चोरी, रस्ता अडविणे, जमाव जमविणे, साधी मारहाण तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने नशिराबादच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी ३० जून २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाची छाननी करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी शोएब बिल्डरला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार नशिराबाद पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी केली. सम्राटकुमार बनसोडेविरुद्ध पाच गंभीर गुन्हे भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सम्राटकुमार सुरेश बनसोडे याच्याविरुद्ध शहर व तालुका पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, खंडणी व मारहाण यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. भुसावळ तालुका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. तपासणीनंतर हा प्रस्ताव ६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. त्यानंतर त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले. येरवडा व ठाणे कारागृहात स्थानबद्ध सम्राटकुमार सुरेश बनसोडे याला भुसावळ तालुक्याचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, बाजारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, एएसआय संजय तायडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेत कारागृहात स्थानबद्ध केले. या कारवाईनंतर आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी आदतन गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.


