देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेची 100 वी फेरी पूर्ण देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेची 100 वी फेरी पूर्ण;

14 हजार टनांहून अधिक मालाची वाहतूक; शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांसाठी किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरलेल्या देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेने 5 सप्टेंबर 2026 रोजी आपली 100 वी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना कृषी उत्पादने तसेच विविध प्रकारचा माल देशातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही सेवा किफायतशीर, विश्वासार्ह आणि सुलभ वाहतुकीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.

या शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आला होता. देवळाली ते दानापूर दरम्यान ही रेल्वे दर शनिवारी साप्ताहिक स्वरूपात धावते. रेल्वेत 10 पार्सल व्हॅन आणि 10 सामान्य श्रेणीचे डबे असून, प्रत्येक पार्सल व्हॅनची क्षमता 23 टन आहे.

100 फेऱ्यांमध्ये 14 हजार टनांहून अधिक मालाची वाहतूक

आतापर्यंत या सेवेद्वारे एकूण 14,070.10 टन पार्सल मालाची वाहतूक करण्यात आली आहे. त्यामध्ये 5,472.50 टन नाशवंत वस्तू, तर 8,595.61 टन हार्ड पार्सल मालाचा समावेश आहे. पार्सल वाहतुकीतून सुमारे 5.14 कोटी रुपयांचा महसूल रेल्वेला प्राप्त झाला आहे.

याशिवाय या सेवेतून आतापर्यंत 46,727 प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून सुमारे 1.20 कोटी रुपयांचा प्रवासी महसूल प्राप्त झाला आहे.

डाळिंब, कांदा, सीताफळासह विविध कृषी उत्पादनांची वाहतूक

शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब 1,487.12 टन, कांदा 1,650.69 टन, सीताफळ 259.35 टन, आले 201.91 टन, द्राक्षे 129.85 टन आणि लिंबू 119.06 टन यासह मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यात आली.

याशिवाय बिस्किट, चॉकलेट व कँडी 6,353.24 टन, हग्गीज 574.40 टन, व्हीआयपी बॅग 456.96 टन, प्लास्टिक बॅग 569.53 टन, प्लास्टिक मॅट 519.85 टन, कापड 194.48 टन, खाद्य उत्पादने 187.57 टन आणि औषधे 92.60 टन यांचीही वाहतूक करण्यात आली आहे.

आइस फिश, भेंडी, पानाची पाने, पेरू, शेवगा, कोथिंबीर, खरबूज, फुलकोबी, संत्री, आंबे, बीन्स, बोर, गाजर, मिश्रित फळे आणि अंडी यांसह विविध नाशवंत वस्तूंनाही या सेवेचा लाभ मिळाला आहे.

कृषी अर्थव्यवस्थेला मिळतेय चालना

देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेमुळे नाशिक परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना आपली कृषी उत्पादने व इतर माल दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे-आधारित लॉजिस्टिक्सचा किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कृषी मालाची वेळेत आणि व्यापक बाजारपेठेत वाहतूक करण्यास मदत होत आहे.

या सेवेने 100 वी फेरी पूर्ण करणे ही भुसावळ विभागासाठी गौरवास्पद कामगिरी असून, शेतकरी व व्यापारी समुदायामध्ये या पार्सल-सह-प्रवासी सेवेची वाढती लोकप्रियता आणि उपयुक्तता यामुळे अधोरेखित झाली आहे.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी पार्सल व कृषी लॉजिस्टिक्स सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच प्रभावी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.