भुसावळ (प्रतिनिधी)- येथील अष्टभुजा मंदिर परिसरातील रहिवासी तथा अंगणवाडी सेविका श्रीमती कविता सुनील पाटील (बडगुजर) यांच्या निस्वार्थ समाजसेवा व रुग्णसेवेची दखल घेत त्यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथे आयोजित २६ व्या अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात रेडीयंट टॅलेंट बुक या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे यांचे तेरावे वंशज कुणालजी मालुसरे यांच्या हस्ते कविता पाटील यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाजसेवी आशा सचदेवा, रेडीयंट टॅलेंट बुकच्या ॲड. क्रांती महाजन, संभाजीनगरचे प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. धारूरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कविता पाटील यांनी आपल्या जीवनात निस्वार्थपणे अनेक गरजू व्यक्तींना मदत केली आहे. विशेषतः गरजू रुग्णांना सहाय्य करण्याबरोबरच त्यांच्या उपचारासाठी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून सेवा करण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत. गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून त्यांच्या उपचाराच्या काळात आवश्यक ती मदत करण्यापर्यंत त्या जातीने लक्ष देतात. त्यांच्या या रुग्णसेवा व समाजसेवेचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही. त्यांच्या याच निस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत रेडीयंट टॅलेंट बुक या संस्थेने त्यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्काराने गौरविले. पुरस्कार सोहळ्यास त्यांच्या कुटुंबीयांसह मैत्रिणी उपस्थित होत्या. पुरस्कार मिळाल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व शुभचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी भावना व्यक्त करताना श्रीमती कविता पाटील (बडगुजर) म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मी समर्पित करते.” त्यांच्या या गौरवामुळे भुसावळ परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


