भुसावळ (प्रतिनिधी)- डिजिटल युगात शिक्षणाची साधने, अध्यापनाच्या पद्धती आणि शिक्षकाची भूमिका बदलली असली, तरी विद्यार्थ्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी केले. श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुरभी नगरातील गणपती मंदिरात आयोजित कार्यक्रमात आजचा शिक्षक या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते. भारतीय गुरुपरंपरेपासून मध्ययुगीन शिक्षणव्यवस्था, आधुनिक शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातील शिक्षणाचे बदलते स्वरूप यांचा डॉ. पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष नारायण वडदकर, कोषाध्यक्ष दगडू पाटील उपस्थित होते. प्रारंभी मंदिरातील गणरायाची मूर्तीला तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व स्व. अरूण मांडवकर यांच्या प्रतिमेला डॉ. जगदीश पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यशोदाबाई पाटील यांनी विठ्ठल नामाचा जप केला. शांताबाई ढाके यांनी प्रमुख वक्ते डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष नारायण वडदकर यांनी डॉ. पाटील यांचा सत्कार केला. तसेच शिक्षक दिनानिमित्त संघातील शिक्षक सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या व्याख्यानात म्हणाले की, भारतीय गुरूकुल परंपरेत विद्यार्थी गुरूकडे विषय शिकण्याबरोबरच जीवन जगण्याची कला आत्मसात करत होता. पुढे आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शाळा, अभ्यासक्रम आणि औपचारिक शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षणाची साधने आणि शिक्षकाची भूमिकाही बदलत गेली. आज माहितीचा मोठा स्रोत विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल झाला आहे. त्यामुळे शिक्षकाने केवळ माहिती देणारा म्हणून न राहता विद्यार्थ्याला योग्य माहिती निवडण्यास, तिचे विश्लेषण करण्यास आणि तिचा योग्य वापर करण्यास सक्षम करणे गरजेचे आहे. पूर्वी शिक्षक माझे ऐका असे म्हणायचे तर आजचा शिक्षक चला, आपण मिळून शोधूया असे म्हणतो. यातूनच शिक्षकाच्या बदललेल्या भूमिकेचे त्यांनी प्रभावीपणे स्पष्टीकरण केले. डिजिटल शिक्षण, इंटरनेट आणि AIच्या युगात शिक्षक हा केवळ माहिती देणारा न राहता मार्गदर्शक, प्रेरणादाता, समुपदेशक, संशोधक आणि मेंटॉर झाला आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी विद्यार्थ्याच्या भावनिक, सामाजिक आणि नैतिक जडणघडणीत शिक्षकाची भूमिका महत्त्वाचीच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठांनी समाज शिक्षक व्हावे ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक भूमिकेवर बोलताना डॉ. पाटील यांनी, आपण निवृत्त झाला असाल, पण समाजासाठी आपली भूमिका निवृत्त झालेली नाही, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांकडे केवळ वयाचा अनुभव नसून जीवनाचा समृद्ध अनुभव, सामाजिक जाण आणि मूल्यांचा ठेवा आहे. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी मोठी शैक्षणिक संपत्ती ठरू शकतो. शाळा आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच जीवनानुभवाचे शिक्षण मिळू शकते. यासाठी शाळांमध्ये एक ज्येष्ठ, एक वर्ग यांसारखे उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये अनुभव व ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणता येईल, अशी अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. निवृत्तीनंतर समाजापासून अलिप्त न राहता ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा उपयोग पुढील पिढी घडविण्यासाठी करावा आणि समाज शिक्षक म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले. दोन पिढ्यांमधील संवाद वाढल्यास विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात संघाचे अध्यक्ष नारायण वडदकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात १९६५ पासून शिक्षक दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचाही त्यांनी उल्लेख केला. सूत्रसंचालन संघाच्या सचिव विद्या रामवंशी यांनी तर आभार निवृत्ती वाडे यांनी मानले. ज्ञानदेव इंगळे यांनी छायाचित्रण केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोपटराव पाटील, सुधा खराटे, डी. एस. पाटील, शालिग्राम पाचपांडे, बाळकृष्ण झांबरे, मीना पाटील, कुसुम पाटील, रेखा भालेराव, विलास नेहेते तसेच कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.


