संघटनेने दिलेले उपक्रम प्रभावीपणे राबवून संघटन मजबूत करा – विजय चोरडिया ;

तालुका पातळीवर प्रत्येक पत्रकाराचा विमा काढण्याचे निर्देश
पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, आरोग्य उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन
लातूर जिल्ह्यासह विविध तालुका कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर
   
लातूर : व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी 2 येणारे विविध उपक्रम जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रभावीपणे, नियोजनबद्ध पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. संघटनेने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही केवळ पदापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कामातून सिद्ध झाली पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि संघटनेच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले.

लातूर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संघटनेच्या आगामी उपक्रमांचे नियोजन, सदस्य नोंदणी, पत्रकारांचा विमा, पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक उपक्रम तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरील संघटनात्मक बांधणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना विजय चोरडिया बोलत होते.

बैठकीस राज्य उपाध्यक्ष संगम कोटलवार, मराठवाडा संघटक बालाजी फड, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष वामन पाठक, महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील, डिजिटल विंगचे विभागीय अध्यक्ष डॉ. सितम सोनवणे, जिल्हाध्यक्ष दिपरत्न निलंगेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष काकासाहेब घुटे, ॲड. विनोद निला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विजय चोरडिया म्हणाले की, ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या पत्रकारांसमोर अनेक अडचणी असतात. मर्यादित साधनसामग्रीमध्ये पत्रकारिता करत असताना त्यांना सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा पत्रकारांना संघटित करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही संघटनेची प्रमुख जबाबदारी आहे. त्यासाठी केवळ बैठका घेणे पुरेसे नाही, तर प्रत्येक उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ संबंधित पत्रकारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

तालुका पातळीवर संघटनेचे काम अधिक गतिमान करण्यासाठी तालुकाध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराशी संपर्क साधावा. प्रत्येक सदस्याची अधिकृत नोंदणी पूर्ण करावी आणि संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावी. सदस्य नोंदणी ही संघटनेच्या कामाचा पाया असून, प्रत्येक सदस्याने संघटनेचा अधिकृत नोंदणी फॉर्म भरणे बंधनकारक आहे. नोंदणी फॉर्म पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच संघटनेचा अधिकृत सदस्य म्हणून मान्यता राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने विमा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक तालुकाध्यक्षाने आपल्या तालुक्यातील एकही सदस्य विम्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सदस्यांची माहिती संकलित करून विमा प्रक्रियेचे काम वेळेत पूर्ण करावे. हा उपक्रम केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी न करता प्रत्येक पत्रकाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविण्यात यावा, असे आवाहन चोरडिया यांनी केले.

पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठीही संघटनेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक मदत तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात यावे. पत्रकार हा समाजासाठी सातत्याने काम करत असतो; त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या गरजांकडेही संघटनेने संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यावरही त्यांनी भर दिला. पत्रकारांच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुका पातळीवर नियमित आरोग्यविषयक उपक्रम घेऊन पत्रकारांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

संघटनेची खरी ताकद ही पदाधिकाऱ्यांच्या पदांमध्ये नसून प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे आत्मपरीक्षण करून संघटनेच्या उद्दिष्टांसाठी सातत्याने काम केले पाहिजे. जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीतील समन्वय वाढवून प्रत्येक उपक्रमाचे नियोजन करावे. एखादा उपक्रम सुरू केल्यानंतर त्याचा आढावा घेऊन तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी संबंधित पदाधिकाऱ्यांनी स्वीकारावी, असेही चोरडिया यांनी सांगितले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष संगम कोटलवार यांनी बैठकीची पार्श्वभूमी विशद केली. संघटनेच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा संघटक बालाजी फड यांनी संघटनेचा विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक तालुक्यात संघटनेची कार्यकारिणी सक्षम करून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष वामन पाठक यांनी साप्ताहिक आणि लघुपत्रकारांच्या प्रश्नांवर संघटनेने अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांनी महिला पत्रकारांच्या सहभागातून संघटनात्मक कामाला अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर दिला. डिजिटल विंगचे विभागीय अध्यक्ष डॉ. सितम सोनवणे यांनी बदलत्या माध्यमविश्वात डिजिटल पत्रकारितेचे वाढते महत्त्व आणि पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची गरज व्यक्त केली.

बैठकीदरम्यान लातूर जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात जिल्हा तसेच तालुका पातळीवर विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासोबतच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

बैठकीत लातूर जिल्हा तसेच विविध तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्षपदी दिपरत्न निलंगेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब घुटे व ॲड. विनोद निला, विभागीय संघटकपदी बालाजी फड, तर डिजिटल विंगच्या विभागीय प्रदेशाध्यक्षपदी डॉ. सितम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. औसा तालुकाध्यक्षपदी विनायक मोरे, तर चाकूर तालुकाध्यक्षपदी प्रशांत शेटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार काम करून पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करून पत्रकारांच्या हिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
———
फोटो ओळ : लातूर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हास्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया. यावेळी राज्य उपाध्यक्ष संगम कोटलवार, मराठवाडा संघटक बालाजी फड, वामन पाठक, वैशाली पाटील, डॉ. सितम सोनवणे, दिपरत्न निलंगेकर, काकासाहेब घुटे, ॲड. विनोद निला आदी.
———