शिक्षकदिन ‘ शिक्षकांचा वार्षिक उत्सव-जयसिंग वाघ


    भारतात ५ सप्टेंबर हा दिवस ' शिक्षकदिन ' म्हणून १९६२ पासून साजरा केला जात आहे . शिक्षकदिन हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो . १९६६ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व युनेस्कोने  शिक्षकांच्या हक्क , जबाबदाऱ्या व त्यांच्या कामाच्या परिस्थिती बाबत काही शिफारशी स्वीकारल्या व ५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षकदिन म्हणून जाहीर केला आहे . शिक्षक हे एखाद्या कारागीराप्रमाणे विद्यार्थ्याला घडवीत असतात . कारागीर ज्याप्रमाणे मूर्ती घडवीत असतो त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थी घडवीत असतात . प्रत्येक विद्यार्थ्याच्या  आयुष्यात शिक्षकाची भूमिका विशेष असते . देशाचा उत्तम नागरिक बनावा म्हणून शिक्षक हे मेहनत घेत असतात .
     शिक्षकांच्या संदर्भाने युनेस्को ने मान्य केलेल्या काही शिफारशी साधारणतः पुढील प्रमाणे आहेत .
 १) शिक्षकांना केवळ ज्ञान देणारी व्यक्ती म्हणून न मानता राष्ट्र उभारणीत योगदान देणारे तज्ञ म्हणून मानावे .
२) शिक्षकांना शिकवण्याच्या पद्धती निवडणे , योग्य शैक्षणिक साधनांचा वापर करणे व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे या करिता पुरेसे स्वातंत्र्य असावे .
३) शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणतीही धोरणे वा अभ्यासक्रम ठरविताना शिक्षकांना विश्वासात घेतले जावे , त्यांचेशी चर्चा करून निर्णय घेतले जावेत .
४) शिक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वी प्रत्येक उमेदवारास उच्य दर्जाचे शैक्षणिक व व्यावहारिक प्रशिक्षण दिले जावे . 
५) शिक्षकांना मानसिक स्वास्थ लाभावे , त्यांचे लक्ष केवळ अध्यापनावर केंद्रित व्हावे या करिता त्यांना त्यांच्या नोकरीची हमी / सुरक्षा असावयास पाहिजे .
६) शिक्षकाचे कामाचे तास अश्याप्रकारे निश्चित केले गेले पाहिजे की, शिक्षकांना अभ्यासक्रमाची तयारी करण्या साठी , विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी , स्वतःच्या विश्रांती साठी पुरेसा वेळ मिळू शकेल .
७) शिक्षकांच्या बदल्या , पदोन्नती या संबंधीची प्रक्रिया ही पारदर्शक स्वरूपाची तर असावी तसेच ती गुणवत्तेवर आणि पूर्वनिश्चीत नियमांना अनुसरून असायला हवी .
८) शिक्षकांचे वेतन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत असावे .  ई.
      विद्यार्थांची तसेच राष्ट्राची जडण - घडण शिक्षकाने करावी अशी अपेक्षा बाळगली जाते मात्र या शिक्षकास जडण - घडण करण्या करिता आवश्यक साधने उपलब्ध नसतात . त्याचे कामाचे तास निश्चित नसतात . शाळेच्या व्यतिरिक्त इतर कामे त्याला करावी लागतात . हल्ली सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळांना मंजुरी दिली जात असल्याने शिक्षकाच्या नोकरीची सुरक्षा वाऱ्यावर आहे . शिक्षकावर संस्था प्रमुखाचा धाक असतो तसेच शिक्षणात संस्था प्रमुखाची ढवळा ठवळ असते हे वेगळेच . त्याचे वेतन निश्चित नसते . त्याला कोणत्या सोई, सवलती नसतात . शिक्षकाची सामाजिक प्रतिष्ठा जोपासली  जात नाही त्यामुळे आताचे शिक्षकदिन शैक्षणिक उपक्रमाचा निव्वळ एक भाग म्हणून राहिलेला आहे . भारतात ब्रिटिशांनी जेंव्हा शाळा सुरू केल्या तेंव्हा शिक्षकांना समाजात मोठा मान होता . शिक्षक सुद्धा अतिशय मेहनती , प्रामाणिक तसेच विद्यार्थ्यांप्रती एकनिष्ठ होते . अस्पृश्य विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होता तरी शिक्षक त्या अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पास होण्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत होता .
    भारतात शिक्षणाचे महत्व महात्मा फुले यांनी ओळखले व त्यासंबंधाने चळवळ उभी केली . त्यांनी मुली , शूद्र , अतिशूद्र मुलांकरिता शाळा सुरू केल्या . अनेक शिक्षक तयार केले . शिक्षकांविषयी ते म्हणायचे की , शूद्र - अतिशूद्र मुलांच्या शिक्षणाकरिता शिक्षक सुद्धा बहुजन समाजातील किंवा शेतकरी वर्गातील असावा . शिक्षकाला उचित प्रशिक्षण दिलेले असावे , प्राथमिक शाळेतील शिक्षक हे नेहमी प्रशिक्षित असले पाहिजे , शिक्षकांना शेती , आरोग्य , स्वच्छता विषयी किमान प्राथमिक माहिती असायला पाहिजे . ग्रामीण भागातील शिक्षकांना यशस्वी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रोत्साहन भत्ता दिला जावा जेणे करून त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल .
    शिक्षकांच्या सन्मानार्थ सन १९४४ मध्ये अमेरिकेत म्याटी ह्याईट वूडिज या शिक्षिकेने आंदोलन सुरू केले व राष्ट्रीय पातळीवर शिक्षकांच्या सन्मानार्थ एक दिवस सुट्टी दिली जावी अशी मागणी केली . तसे त्यांनी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट व त्यांच्या पत्नी एलिनार रुझवेल्ट यांना लेखी कळविले . बऱ्याच वर्षांनी म्हणजे १९८० मध्ये अमेरिकन संसदेने ७ मे हा दिवस ' राष्ट्रीय शिक्षक दिवस ' म्हणून देशभर साजरा करावा असा ठराव संमत केला. पुढं १९८५ मध्ये नॅशनल एज्युकेशन असोसिएशनने मे महिन्याचा पहिला आठवडा शिक्षकदिन साजरा केला जावा असा निर्णय घेतला . या संपूर्ण आठवडाभर अमेरिकेत शिक्षकाच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम घेतले जातात . 
    चीन मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो , याची सुरवात १९८५ मध्ये झाली . चीन मध्ये कंन्फ्युशियस यांस सर्वात श्रेष्ठ शिक्षणतज्ञ मानतात , त्यांनी आपले सर्व आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले आहे . त्यांनी समाजातील सर्व वर्गांसाठी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत . शिक्षण हे वैयक्तिक व सामूहिक अश्या दोन्ही स्तरावर महत्त्वाचे असते असे त्यांचे म्हणणे होते . मला शिक्षणाचा कधीच कंटाळा आला नाही व मी जे शिकलो ते इतरांना शिकवताना मी कधीच थकलो नाही असे ते सांगत असत . कंन्फ्युशियस यांचा जन्मदिवस म्हणून ते हा दिवस साजरा करतात .
    भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाले असता त्यांचे मित्र त्यांना भेटावयास गेले व  " तुमचा जन्मदिवस आम्ही एक खास दिवस म्हणून साजरा करू इच्छितो तेंव्हा आम्हास परवानगी द्या  " असे मित्रांनी सांगितले तेंव्हा राधाकृष्णन यांनी माझा जन्मदिवस हा ' शिक्षकदिन ' म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल असे सांगितले व पुढं भारत सरकारने त्यास मान्यता दिली व भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा होऊ लागला .
    शिक्षकदिन हा शिक्षकांकरिता  एक राष्ट्रीय वार्षिक उत्सवच असतो .या दिवशी विविध शिक्षकांना विविध पुरस्कारांनी पुरस्कृत केले जाते . विद्यार्थी , संस्था , पालक शिक्षकांना शुभेच्छा , भेटवस्तू देतात . सर्वच देशांमध्ये  शिक्षक हे वंदनीय , पूजनीय मानले जातात हा शिक्षकांचा सर्वातमोठा गौरव होय . 
लेखक ..... जयसिंग वाघ 
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक व, जळगाव 
संपर्क ...... ९८८१९२८८८१