भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांकडून ‘संरक्षा पुरस्कार’ ;

भुसावळ(प्रतिनिधी )-: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कता, कर्तव्यनिष्ठा आणि रेल्वेच्या सुरक्षित परिचालनासाठी केलेल्या तत्पर कार्यवाहीबद्दल ‘संरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.
कर्तव्यावर असताना प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट संरक्षा कार्याचा गौरव करणारा लेख आणि रोख बक्षीस यांचा समावेश आहे.
अरविंद कुमार साहा यांची सतर्कता
भुसावळ विभागातील खंडवा येथे कार्यरत ट्रॅफिक इन्स्पेक्टर श्री. अरविंद कुमार साहा हे २२ जून रोजी गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. बडगाव स्थानकाच्या पुढे रुळांवर झाडाच्या फांद्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी असिस्टंट लोको पायलटच्या मदतीने तातडीने फांद्या हटवल्या. तसेच आबना पुलावरील ‘अप’ मार्गावर लोखंडी खांब धोकादायकरीत्या झुकल्याचे आढळून आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देऊन योग्य ती कार्यवाही करून घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
कमलेश कुमार यांनी रुळाला तडा ओळखला
भुसावळ येथील असिस्टंट लोको पायलट श्री. कमलेश कुमार हे १२ जुलै रोजी मालगाडीवर कर्तव्य बजावत असताना बीटीपीएस साइडिंगमध्ये प्रवेश करताना रुळाला तडा गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य केले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
राजेश पाटील यांनी आग आटोक्यात आणली
आरओएच भुसावळ येथील तंत्रज्ञ श्री. राजेश रमेश पाटील हे १ जुलै रोजी जळगाव स्थानकावर कर्तव्यावर असताना गाडी क्रमांक ११०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–अमृतसर एक्स्प्रेसच्या ब्रेक व्हॅनमध्ये ब्रेक ब्लॉक जाम झाल्याने आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ब्रेक व्हॅनचा ‘डीव्ही’ व्हॉल्व्ह रिलीज करून सर्व कॉक्स बंद केले व वेगळे केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती दिली. त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
या प्रसंगी श्री. प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, श्री. चंद्र किशोर प्रसाद, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, तसेच विविध विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.