भुसावळात वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. सत्येंद्र सिंह यांचे वनवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्याने जंगी स्वागत ;वनवासी-ग्रामवासी-नगरवासी, आम्ही सर्व भारतवासी’ जनसंवाद कार्यक्रमात केले मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी) — ‘वनवासी-ग्रामवासी-नगरवासी, आम्ही सर्व भारतवासी’ या भावनेतून कार्यरत असलेल्या देवगिरी कल्याण आश्रमातर्फे भुसावळ येथे विशेष जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष मा. श्री. सत्येंद्र सिंह हे प्रवासादरम्यान भुसावळ येथे आले असता वनवासी बांधवांनी ढोल व पारंपरिक वाद्यांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करून त्यांचे जंगी व उत्साहपूर्ण स्वागत केले.

शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शांतिनगर, भुसावळ येथील कमल गणपती हॉल येथे आयोजित कार्यक्रमात श्री. सत्येंद्र सिंह यांनी उपस्थितांशी जनसंवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर देवगिरी कल्याण आश्रम प्रांतचे डॉ. किशोर मोरे, भुसावळ-जळगाव जिल्हाध्यक्ष तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ. निलेश भिरुड आणि डॉ. सोनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता, श्रीराम, स्व. श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे तसेच वनवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे ठरले विशेष आकर्षण

कार्यक्रमस्थळी वनवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच भव्य व सुंदर रांगोळ्यांनी परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जनजाती बांधवांनी ढोल व पारंपरिक वाद्यांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. महिला जिल्हा अध्यक्षा ॲड जास्वंदी भंडारी यांनी मुख्य प्रवेशद्वारावर पारंपारिक पद्धतीने औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले. वनवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पारंपरिक नृत्य व स्वागत सोहळा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वनवासी, ग्रामवासी, नगरवासी… आम्ही सर्व भारतवासी’ या जनसंवाद कार्यक्रमात अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. सत्येंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची सविस्तर माहिती देताना सांगितले की, आश्रमाची स्थापना २६ डिसेंबर १९५२ रोजी छत्तीसगडमधील जशपूर नगर येथे स्व. श्रद्धेय रमाकांत केशव देशपांडे अर्थात बाळासाहेब देशपांडे यांनी केली. वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, हितरक्षा, विकासकार्य, ग्रामविकास, क्रीडा व कला आदी विविध क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे.

‘तू-मैं एक रक्त’ या भावनेतून ग्रामवासी, वनवासी आणि नगरवासी हे सर्व एकाच समाजाचे घटक असून त्यांच्यात आपलेपणाचा भाव दृढ करणे, हा आश्रमाच्या कार्याचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वनवासी समाजाची प्राचीन संस्कृती व परंपरांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. कल्याण आश्रमाचे कार्य १४ विविध आयामांच्या माध्यमातून कसे चालते, याचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

श्री. सिंह म्हणाले की, वन हे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. पूर्वीपासून वनवासी बांधवांनी वनात राहून वनसंस्कृतीचा विकास केला आहे. वन हे प्रकृतीचे विश्वविद्यालय असून ही संस्कृती जपणाऱ्या वनवासी बांधवांचा ग्राम, नगर व शहरांमध्ये सर्वांगीण विकास व्हावा, ही दूरदृष्टी आदरणीय बाळासाहेब देशपांडे यांनी ओळखली. त्यामुळे त्यांनी या समाजाच्या परिवर्तनासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

‘तू-मैं एक रक्त’ ही संकल्पना समोर ठेवून शासनाच्या भरवशावर विसंबून न राहता समाजाच्या सहकार्याने कार्य उभे करण्याचे ठरविण्यात आले. जशपूर येथे वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना करून सेवा, शिक्षण, ग्रामविकासासह विविध १४ आयामांतून कार्य सुरू करण्यात आले.

सद्यस्थितीत देशात सुमारे १ लाख ८७ हजार गावे असून अद्यापही अनेक ठिकाणी संपर्क पोहोचलेला नाही. त्यामुळे अधिक जोमाने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी धर्मांतराचे प्रयत्न होत असल्याचा उल्लेख करून त्यांनी समाजाने सजग राहण्याचे आवाहन केले.

देशातील नगरांमध्ये २० ते २५ टक्के वनवासी समाजातील बांधव विविध ठिकाणी कार्यरत असून त्यांच्यासाठी नगरसमितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. येणारे २०२७ हे वनवासी कल्याण आश्रमाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत हा हरणारा देश नसून ‘मृत्युंजय भारत’ असल्याचे सांगत त्यांनी धर्म, संस्कृती, परंपरा आणि रीतीरिवाजांचे जतन करण्याचे आवाहन केले. भारतातील मंदिरे, देवस्थाने, पुजारी आणि ऐतिहासिक श्रद्धास्थळे ही समाजाच्या आशेची केंद्रे असून देवी-देवतांची स्थाने व ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.

कल्याण आश्रम जनजाती समाजाला सशक्त करण्याचे कार्य करीत असून हे राष्ट्रीय कार्य देशाच्या हितासाठी आहे. जनजाती समाज टिकला व सशक्त झाला तर देशाच्या विकासाला अधिक बळ मिळेल. त्यामुळे जनजाती समाजाला वाचवणे आणि जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन श्री. सत्येंद्र सिंह यांनी केले. त्यांनी भुसावळ-जळगाव जिल्ह्यात देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचीही प्रशंसा केली.

जनसंवादादरम्यान वनवासी समाजासमोरील विविध प्रश्न, समस्या व अपेक्षा उपस्थित बांधवांनी मांडल्या. श्री. सिंह यांनी त्यांच्याशी संवाद साधून विविध शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ-जळगाव जिल्ह्याचे सचिव काशिनाथ बारेला सर यांनी केले, तर जिल्हा सहसचिव प्रा. निलेश बेंडाळे यांनी आभार मानले. महिला प्रांत प्रमुख चित्रा पुराणिक यांनी अतिशय सुंदर सांघिक गीत सादर केले, तर जिल्हा सहकोषाध्यक्ष ॲड. जयश्री देशमुख यांनी वैयक्तिक गीत सादर केले.

कार्यक्रमाचा समारोप शांती मंत्राने करण्यात आला. कार्यक्रमास भुसावळ-जळगाव जिल्ह्यातील विविध पाड्यांवरील वनवासी समाजातील भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठित नागरिक, बंधू-भगिनींनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. यशस्वीतेसाठी वीरसिंग, दिनेश बारेला, यांचेसह देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ व महिला समिती यांनी परिश्रम घेतले . प्रसंगी उपस्थित नागरिक व वनवासी समाजातील बांधव-भगिनींचे देखील स्वागत करण्यात आले.