खिर्डी येथे भरदिवसा दरोडा; दीड लाखांचा ऐवज लंपास, रावेर तालुक्यातील प्रकार; पोलीस, एलसीबी व फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी पाहणी ;

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिर्डी बु. येथील रहिवासी प्रदीप अशोक महाजन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेदरम्यान घडली.

प्रदीप महाजन हे कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. त्यांचा मुलगा कुणाल शाळेत गेला होता, तर आई शेतात गेली होती. दुपारी घराचा दरवाजा उघडा असल्याचे मुलगा कुणाल याने फोनवरून सांगितल्यानंतर प्रदीप महाजन यांच्या आईने घरी येऊन पाहणी केली. यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी प्रदीप अशोक महाजन यांनी १९ ऑगस्ट रोजी निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी सकाळी फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याच्या सपोनि. मीरा देशमुख, सउपोनि. तडवी यांच्यासह एलसीबीचे पथक, फैजपूर विभागातील फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी तसेच ठसे तज्ज्ञ सचिन चौधरी (जळगाव) यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सउपोनि. तडवी तसेच पोहेका रिजवान पिंजारी व शिंदे करीत आहेत.