भुसावळ (प्रतिनिधी ): हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी २११.८८० मीटर इतकी नोंदविण्यात आली. हतनूर धरणाची पूर्ण संचय पातळी २१४.००० मीटर असून, एकूण पाणीसाठा २७५ दशलक्ष घनमीटर (७०.८८ टक्के) आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १४२ दशलक्ष घनमीटर (५५.६९ टक्के) इतका आहे. धरणाच्या १६ रेडियल गेटमधून प्रत्येकी १ मीटरने उघडून ९८९ क्युसेक (३४,९२७ क्युसेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. तसेच कालव्यातून ५.६६ क्युसेक (२०० क्युसेक) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून सध्या विसर्ग निरंक आहे. दरम्यान, आज दिवसभरात २६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस ४०७ मिमी इतका झाला आहे. धरणातील पाणीसाठा आणि पाण्याची आवक लक्षात घेता विसर्गावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.


