मुक्ताईनगर नगर (प्रतिनिधी) लोकनेते आ.नाथाभाऊ अमृत महोत्सव समितीतर्फे दिनांक 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती माजी विधान सभापती अरुण भाई गुजराती यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, नाथाभाऊ दिनांक 2 सप्टेंबर रोजी 74 वर्ष पूर्ण करून 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त 26 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान कोथळी मुक्ताईनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा अमृत पर्वाचा अभिवादन सोहळा दिनांक 30 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. नाथाभाऊ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन केले असून रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संत मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथे अमृत महोत्सवी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला सर्वपक्षीय पक्षी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, असेही अरुण भाई गुजराती म्हणाले, अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा 26 ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी काकड आरती चार ते सहा वाजेच्या दरम्यान होईल, विष्णुसहस्त्रनाम सकाळी साडेसहा ते सात मुक्ताई चरित्र सकाळी सात ते दहा प्रवचन सकाळी दहा ते अकरा होईल. दुपारी दोन वाजता श्रीमद् भागवत कथा सुरू होईल सायंकाळी हरिपाठ रात्री आठ वाजता कीर्तन, असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथा वाचक ह.भ.प खगेंद्र महाराज शहादेकर, ह.भ.प महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, ह.भ.प विशाल महाराज खोले, ह.भ.प रमेश महाराज आडविहीरकर, ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर शास्त्री, श्री भक्ती प्रिय दास महाराज, आचार्य मानेकर बाबा शास्त्री, श्री संत गोपाल चैतन्य महाराज यांच्यासह विविध मठातील साधुसंतांची उपस्थिती लाभणार आहे, असेही गुजराती म्हणाले. अमृत महोत्सव समितीचे सचिव प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे म्हणाले की, लोकनेते अभिवादन सोहळ्यासाठी साठ फूट बाय ८० असा सभा मंडप राहणार असून 120 प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच इतरांना दिसण्यासाठी मोठा एलईडी देखील लावण्यात आलेला आहे. कोथळीपासून ते सभागृहापर्यंत दिंडी लेझीम पथक पार्किंग व्यवस्था असे विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाऊस येईल, असे गृहीत धरून ड्रोन मंडप देखील टाकण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमंत्रित साधुसंतांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. तसेच महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. राज्यभरातील मंत्री व आमदारांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवलेले असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन देखील नेवे यांनी केले आहे.


