भुसावळ (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित व प्रभावी कारवाई सुनिश्चित करण्यासाठी तसेच विविध सुरक्षा व संबंधित विभागांमध्ये उत्तम समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दिनांक 12.08.2026 रोजी भुसावळ स्थानकाच्या दक्षिण बाजूस पूर्वनियोजित मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. मॉक ड्रिलदरम्यान दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षा व्यवस्था, त्वरित प्रतिसाद, बचाव व मदतकार्य तसेच विविध विभागांमधील परस्पर समन्वयाच्या तयारीचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. या मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद विरोधी शाखा, जळगावचे 02 अधिकारी, बॉम्ब शोध व निकामी पथक, जळगावचे 06 कर्मचारी व श्वान ‘सिंबा’, अग्निशमन दल, भुसावळचे 02 कर्मचारी, त्वरित प्रतिसाद पथक, जळगावचे 16 कर्मचारी, वैद्यकीय विभाग, भुसावळचे 04 कर्मचारी, भुसावळ स्थानक निरीक्षक पवन कुमार व 12 आरपीएफ कर्मचारी तसेच शासकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव व 30 शासकीय रेल्वे पोलीस कर्मचारी, अशा एकूण 72 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मॉक ड्रिलदरम्यान सर्व संबंधित विभागांनी निर्धारित भूमिकेनुसार त्वरित कारवाई, घटनास्थळाची सुरक्षा, संभाव्य धोक्याची ओळख, बचाव व मदतकार्य तसेच वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे आदी विविध बाबींचा सराव केला. सदर मॉक ड्रिल शांततेत व यशस्वीरीत्या पार पडली. या सरावाच्या माध्यमातून कोणत्याही आकस्मिक परिस्थितीत सर्व संबंधित विभागांची तत्परता, परस्पर समन्वय आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्याच्या तयारीला अधिक बळकटी मिळाली.




