भुसावळ (प्रतिनिधी)- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजीच्या एकूण ५० चिमुरड्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. स्पर्धे दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील कवितांचे सादरीकरण केले. चिमुकल्यांचा आत्मविश्वास,योग्य हावभाव,स्पष्ट उच्चार आणि प्रभावी सादरीकरण पाहून उपस्थित पालक आणि शिक्षक भारावून गेले होते. सर्वांनीच या बालकांचे मनापासून कौतुक केले. मान्यवर परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे उच्चार, आत्मविश्वास,सादरीकरण,हावभाव आणि विषयानुरूपता या निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले. यामधून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य,आत्मविश्वा,मंचावरील सादरी करणाची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होते,असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून मार्था राठोड व कल्पना वारुडकर यांनी काम पाहिले. याप्रसंगी शिक्षिका स्मिता जाधव,चेतना झोपे, क्रिस्तीनिया साबळे, वर्जिनीया बर्नड, सिसीलीया मॅथ्यू, केओना रॉड्रिक्स, स्मिता नन्नवरे, सोनिया डोबॉल, लिज्जी मोल यांच्यासह इतर शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया दोबाल यांनी केले,तर उपस्थितांचे आभार स्मिता जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन - काव्यवाचन स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांसोबत प्रिंसिपल निना कटलर सोबत स्मिता जाधव,कल्पना वारुळकर,मार्था राठोड आदी.


