भुसावळ ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने लेवा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी जाहीर केलेले लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ अद्याप प्रभावीपणे कार्यान्वित झालेले नसल्याने समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामंडळासाठी आवश्यक निधी, अध्यक्ष व संचालक मंडळाच्या नियुक्त्या तसेच प्रत्यक्ष कामकाज तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लेवा हितवादी चळवळीचे युवा नेते शिशिर डी. जावळे यांनी दिला आहे. यासंदर्भात जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन पाठवून महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. निवेदनात महामंडळासाठी पुरेसा निधी मंजूर करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील विविध समाजांच्या आर्थिक विकास महामंडळांना शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून स्वयंरोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास, शैक्षणिक सहाय्य आणि विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ अद्यापही प्रभावीपणे कार्यरत नसल्याने शासनाच्या भूमिकेबाबत समाजात प्रश्न उपस्थित होत आहेत. जावळे यांनी म्हटले आहे की, लेवा समाजाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग, सहकार आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान दिले असून, इतर समाजांप्रमाणेच विकासाच्या समान संधी मिळणे हा समाजाचा घटनात्मक आणि न्याय्य अधिकार आहे. समाज कोणताही विशेष लाभ मागत नसून समान न्याय आणि समान विकासाची अपेक्षा व्यक्त करीत आहे. युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळामार्फत कर्ज योजना, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, शैक्षणिक सहाय्य आणि उद्योग प्रोत्साहनाच्या योजना तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष न दिल्यास आणि महामंडळाबाबतची उदासीन भूमिका कायम ठेवल्यास राज्यभर लेवा समाजाच्या सहभागातून लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती लेवा हितवादी चळवळीचे युवा नेते शिशिर डी. जावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आह


