भुसावळ, (प्रतिनिधी) ता. ३ : येथील तीन तरुण व्यवसायिकांना 'मराठी उद्योजक' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सॅटर्डे क्लबच्या जळगाव एमआयडीसी चॅप्टर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ अजित मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 'मराठी उद्योजक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. यात भुसावळच्या तीन तरुण व्यवसायिकांना समावेश होता. यात शंभर पेक्षा अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ममता हॉटेल व माय फिटनेस जिमचे संचालक तसेच वरणगाव येथील मंगल कार्यालयाचे प्रमुख प्रमोद धनगर, ठिबक सिंचन साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने उत्पादन करणारे व १२६ पेक्षा अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे रिदम इरिगेशन कंपनीचे मालक आकाश निळे, सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अत्याधुनिक पद्धतीने ट्यूब उत्पादन करणारे व १५० युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे मारुती एंटरप्राईजेसचे संचालक सुशील झोपे या व्यवसायिकांचा समावेश होता. सॅटर्डे क्लबचे चेअरमन डॉ अजित मराठे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सॅटर्डे क्लबचे जळगाव रीजन हेड अभिजित पाटील, डेप्युटी हेड डॉ दिपक पाटील, जळगाव एमआयडीसी चाप्टर चे चेअरमन धिरज महाजन सचिव गौतम चौधरी खजिनदार निलेश शेटे भुसावळ चाप्टर चे अध्यक्ष दीपेश सोनार व सचिव कुणाल महाजन आदी उपस्थित होते.


