थरारक घटना ! झोपेतच मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षीय मुलगा गंभीर

 
  चोपडा - चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. झोपेत असलेल्या आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर जन्मदात्या पित्याने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला असून ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मीरा सुभाष भिलाला (वय १३) व रामु सुभाष भिलाला (वय ११) ही भावंडे रात्री घरात झोपलेली असताना त्यांचे वडील सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) यांनी कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मीरा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रामु याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाऊन जवळील जंगलात लपल्याची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. जंगलाला वेढा घालून काही तासांतच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती वाद, मानसिक अस्वस्थता किंवा इतर कोणते कारण याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून रक्ताने माखलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.