मुसळधार पावसातही भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात :

 भुसावळ (प्रतिनिधी) - गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी आपल्या रनिंग गुरू व प्रेरणास्थान प्रा. प्रवीण फालक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आगळावेगळा गुरुपौर्णिमा सोहळा साजरा केला. पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाही सर्व धावपटू सकाळी ५.३० वाजता कृष्णचंद्र हॉल येथे मोठ्या उत्साहाने एकत्र आले.

प्रा. प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम वॉर्म-अप सत्र पार पडले. त्यानंतर धावपटूंनी ७ ते १० किलोमीटर अंतराची धाव पूर्ण करून ती आपल्या गुरूंना समर्पित केली. धाव पूर्ण झाल्यानंतर मैदानावर सर्वांनी स्ट्रेचिंगचा सराव केला.

यानंतर झालेल्या गुरुपौर्णिमा सत्कार समारंभात डॉ. निलिमा नेहेते यांनी प्रा. फालक यांचे औक्षण केले. रीना परदेशी यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. जगदीश रेहपाडे तसेच संजय व पुष्पा तिवारी या दाम्पत्याने पुष्पगुच्छ अर्पण करून आपल्या गुरूंचा गौरव केला. यावेळी प्रा. फालक यांच्या पत्नी सौ. स्वाती फालक यांचीही उपस्थिती होती. धावपटूंनी त्यांचाही सन्मान करून त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी अनेक धावपटूंनी आपल्या रनिंग प्रवासातील अनुभव कथन केले. धावण्याची प्रेरणा, नियमिततेची सवय, आत्मविश्वास आणि विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे बळ हे सर्व प्रा. प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनातूनच मिळाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला असोसिएशनचे विश्वस्त डॉ. निलिमा नेहेते, डॉ. चारुलता पाटील, प्रवीण वारके, गणसिंग पाटील आणि प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना प्रा. प्रवीण फालक यांनी धावपटूंना नियमित सराव, वेळेचे काटेकोर पालन आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रत्येक धावपटूने शहरातील अधिकाधिक नागरिकांना धावण्यासाठी प्रेरित करावे, जेणेकरून "भुसावळमध्ये रनिंग ही एक लोकचळवळ बनेल," असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छोटू गवळी, प्रशांत वंजारी, प्रशांत चौधरी, सुयश न्याती, गरिमा न्याती, वर्षा वडिले, कीर्ती मोतळकर,  सारंग चौधरी, विश्वनाथ पावरा, संजय चौधरी, सुधीर बेंडाळे आणि मंगेश चंदन यांनी विशेष परिश्रम घेतले.