खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांची तातडीने कारवाई, आरोपी अटकेत

जळगाव : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात नशिराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेत त्याला कायद्याच्या कचाट्यात आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ जुलै २०२६ रोजी पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईने नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सुनील सावके (रा. गोदावरी हॉस्पिटल कॅम्पस, जळगाव) याने अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला गोदावरी कॉलेज व हॉस्पिटल परिसरातील कृषी विभागाच्या चिकूच्या मळ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत नशिराबाद पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५ तसेच पोक्सो अधिनियमातील कलम ४, ६, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक विजय कोळी करीत आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात नशिराबाद पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईमुळे पोलिसांची तत्परता आणि कठोर कारवाईची भूमिका अधोरेखित झाली आहे.