नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरसोद फाट्याजवळ असलेल्या एचडीएफसी बँकेत सोमवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. मात्र, लॉकर फोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक सायरन वाजल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. त्यामुळे मोठी चोरी टळली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२.५० ते १ वाजेच्या दरम्यान घडली. बँकेचा सायरन वाजल्याची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बँकेची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोरट्यांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.


