नशिराबाद(प्रतिनिधी ) - दि. २१ जुलै : नशिराबाद पोलिसांनी वेश्याव्यवसायावर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना नशिराबादकडून सुनसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन खासगी पंटरामार्फत माहितीची खात्री केली. त्यानंतर दुपारी २.२० वाजता सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) आणि कैलास संजय भोई, दोघेही रा. नशिराबाद, यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सांगण्यावरून सदर ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका केली असून, गुन्ह्याशी संबंधित ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावित आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रविण लोहार आणि भुषण पाटील यांनी केली.


