भुसावळ (प्रतिनिधी ) - द लीगल प्रॅक्टिशनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळ वकील संघाच्या सन जुलै २०२६ ते जुलै २०२७ या कालावधीसाठी कार्यकारिणी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, महिला सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, ग्रंथपाल तसेच कार्यकारिणी सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. वकील संघाच्या सर्व पात्र सदस्यांनी दि. २१ जुलै २०२६ रोजी मतदान करून लोकशाही पद्धतीने आपला प्रतिनिधी निवडावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुशील चंद्रकुमार मेढे यांनी केले आहे. मतदान प्रक्रिया अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, भुसावळ येथील बार रूम क्रमांक ३ मध्ये पार पडणार आहे. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. या निवडणुकीकडे तालुक्यातील वकिलांचे लक्ष लागले असून विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू आहे.


