भुसावळच्या व्यापाऱ्याची ६.४७ लाखांची फसवणूक


भुसवाळ, (प्रतिनिधी) ऑनलाईन सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून याचदरम्यान, वाहनावर दंड असल्याचा बनावट मेसेज पाठवून सायबर भामट्यांनी भुसावळातील एका व्यावसायिकाची ६ लाख ४७ हजार ३३३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष मोटूमल सचदेव (वय ३८, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हे गिफ्ट गॅलरीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून 'तुमच्या वाहनावर दंड आहे, पुढील कारवाई टाळण्यासाठी तातडीने दंड भरा' असा मेसेज आणि त्यासोबत एक लिंक पाठविण्यात आली. त्यांनी त्या लिंकवर क्लिक करताच सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला.

त्यांना एका फूड डिलिव्हरी कंपनीच्या नावाने आणखी मेसेज आले. संशय आल्याने त्यांनी आपल्या खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवहार होत नसल्याने त्यांनी खात्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यातून कधी १ लाख, तर कधी ८८ हजार अशा विविध व्यवहारांद्वारे एकूण ६ लाख ४७ हजार ३३३ रुपये परस्पर काढण्यात आल्याचे उघड झाले. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर मनीष सचदेव यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सायबर पोलिसांनी नागरिकांना वाहन दंड, बँक केवायसी, पार्सल किंवा अन्य कोणत्याही कारणाने आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच अशा संशयास्पद मेसेजची खातरजमा अधिकृत संकेतस्थळ किंवा अॅपवरूनच करावी, असे आवाहन केले आहे.