जळगाव, प्रतिनिधी : जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना घडवणाऱ्या अट्टल टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत तब्बल १० गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींकडून एकूण ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६), दीपक बापू पाटील (वय २३), राजेश माणिक राठोड (वय २४), सुमित संजय कोळी (वय १९) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, सर्व रा. जळगाव) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ९ घरफोड्या आणि १ मोटार वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडीतील २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुख्य आरोपी गुरुजीत सिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्यांची मालिका सुरू केली होती. मात्र, पोलिसांच्या धडक कारवाईमुळे त्याच्यासह संपूर्ण टोळीला अटक करण्यात यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले, पोहेकॉ प्रदीप राजपूत तसेच गुन्हे शोध पथकातील अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, कैलास इंगळे, प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे, अशोक पाटील आणि पंकज देशमुख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


