जळगावच्या प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिरात’ संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तिमय भजन कार्यक्रम उत्साहात संपन्न ;

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील बजरंग बोगद्याजवळ असलेल्या प्रसिद्ध 'जागृत नवसाचा गणपती मंदिरात' शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी उपस्थित भाविकांनी गणरायाच्या चरणी भक्तीभावाने स्वरांजली अर्पण केली. विशेष निमंत्रित गायिका वृंदा पाखले तसेच कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे, गुलाब कापडणे, प्रवीण पाटील, विनायक काळे आणि संयोगिता बयाणी यांनी सुमधुर भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

प्रसिद्ध भजनी मंडळ "भक्तीनाद" ग्रुपने एकापेक्षा एक सरस भजने आणि अभंग सादर करून संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून टाकला. "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात भजन संध्या रंगतदार झाली.

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. हलका पाऊस सुरू असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भजनाच्या तालावर अनेक भक्त तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सोहळ्यात अबालवृद्धांसह महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

या कार्यक्रमासाठी नवसाचा गणपती मंदिराचे श्री. व्ही. झेड. (बापू) पाटील, साहित्यिक ज्ञानेश मोरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे हितेंद्र धांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी त्यांनी उपस्थित कलावंतांचा श्रीफळ देऊन सन्मान केला.

एकूणच, सुर आणि भक्तीच्या अनोख्या संगमाने सजलेल्या या भजन सोहळ्यात उपस्थित भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले आणि परिसरात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.