जळगाव, दि. १ जुलै : रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एस.पी. (Road Safety Patrol) व सी.डी. (Civil Defence) या विषयावरील एकदिवसीय सत्र शुभारंभ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य महासमादेशक अनिल कुंभार हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी शहर वाहतूक शाखा, जळगाव येथील मोरेश्वर पेंदाम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. ईश्वर जाधव, विभागीय समादेशक तथा राज्य कार्यकारी सदस्य डॉ. प्रदीप साखरे, आर.एस.पी. जळगाव विभागाचे जिल्हा समादेशक डॉ. संजय निकम आणि जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शैलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशिक्षण शिबिरात राज्य संघटनेच्या नियमावली व शिस्तीचे पालन करून जिल्हा व विभागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आर.एस.पी.च्या पंचसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पथसंचलन, वाहतूक नियंत्रण, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, प्रथमोपचार व बचावकार्य या विषयांचा शालेय स्तरावर प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वर्षभर विविध शालेय व सार्वजनिक उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शैलेश राणे यांचा आर.एस.पी. विभागातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रा. का. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बोदवड येथील डॉ. संजय निकम यांची जळगाव जिल्ह्याच्या आर.एस.पी. जिल्हा समादेशकपदी निवड करण्यात आली. तसेच ए. टी. झांबरे विद्यालय, जळगाव येथील विवेक मोरे आणि का. ऊ. कोल्हे विद्यालय, जळगाव येथील विजय शुक्ला यांची अतिरिक्त समादेशक म्हणून निवड जाहीर करण्यात आली. या प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळांमधील सुमारे ५८ ते ६० प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. का. ऊ. कोल्हे विद्यालय, जळगाव येथील आर.एस.पी. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने पथसंचलनाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अतिरिक्त समादेशक विजय शुक्ला यांनी केले, तर डॉ. संजय निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षण शिबिरामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये रस्ता सुरक्षा, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



