साधारणतः १८ व्या शतका पासून भारतात बौद्ध धर्माचे वारे काही प्रमाणात वाहू लागले होते . श्रीलंकेतील , म्यानमार मधील काही बौद्ध भिक्खू भारतात येऊन बौद्ध धर्माच्या प्रचाराचे कार्य करू लागल्याने त्यास थोडी गती आली. भारतात धर्मानंद कोसंबी, राहुल सांकृत्यायन सारखी काही भारतीय विद्वान बौद्ध भिक्खू होऊ लागले . त्या कालखंडात पंजाब मधील सोहाना या ग्रामीण भागात हरिनाम रामशरण दास ( डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ) यांचा जन्म झाला . वडील रामशरण दास हे शिक्षक होते . हरिनाम यांना लहानपणा पासून शिक्षणाची आवड होती . भगत सिंग त्यांचे वर्गमित्र होते . भगत सिंग , हरिनाम यांच्यावर कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव पडला .
वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा बौद्ध धर्माचे तत्त्वचिंतक राहुल सांकृत्यायन यांचेशी जवळीक झाली . राहुल यांनी त्यांना बौद्ध विचारधारा सांगितली आणि हरिनाम हे बौद्ध विचाराकडं वळू लागले . पुढं त्यांनी भिक्खू होण्याची इच्छा राहुल यांच्याकडं बोलून दाखवली , तेंव्हा त्यांनी हरिनाम यांना श्रीलंकेतील विद्यालंकार विहारात पाठविले . तिथं ते त्या विहाराचे प्रमुख प्रसिद्ध बौद्ध भिक्खू लूनुपोकुने धम्मानंद महस्थाविर यांचे कडून वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भिक्खू म्हणून दीक्षा घेतात व आनंद हे नाव धारण करतात . आपल्या नावाला ते बुद्धकालीन कोसल देशाच्या नावावरून कौसल्यायन ( कोसल चे रहिवासी या अर्थाने ) हा शब्द जोडतात आता त्यांची ओळख भिक्खू आनंद कौसल्यायन म्हणून झाली . पुढं त्यांना विद्यालंकार विद्यापीठाने डी. लिट पदवी प्रदान केली व पुढं ते डॉ. भदंत आनंद कौसल्यायन म्हणून सुपरिचित झाले .
श्रीलंकेत असताना अनागरीक धर्मपाल , राहुल सांकृत्यायन , धर्मानंद कोसंबी , जगदीश कश्यप व इतर बौद्ध भिक्खू यांचे सोबत त्यांची चर्चा होत गेली . त्यातून त्यांची जडण घडण होत गेली . पुज्य भंते अनागरिक धर्मपाल हे भिक्खू आनंद यांना बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ इंग्लंड येथे पाठवतात . इंग्लंड येथे आनंद कौसल्यायन हे बौद्ध धर्माचा चिकित्सक अभ्यास करू लागले . सलग दोन वर्षे अभ्यास करून ते फ्रान्स , जर्मनी या देशांमध्ये जातात . तिथं सुद्धा ते आपला अभ्यास करतात . बौद्ध धर्मासोबत ते पाली , हिंदी , संस्कृत, इंग्रजी , पंजाबी , मराठी , सिंहली , उर्दू या भाषांचा अभ्यास करतात . या सर्व भाषा ते लिहू , वाचू , बोलू शकत होते . त्यांनी पुढं चीन , जपान , थायलंड , म्यानमार , युरोप , नेपाळ , भूतान ई. देशांमध्ये जाऊन बौद्ध धर्म जाणून घेतला .
त्यांनी पाली भाषेतील बौद्ध साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे हिंदी भाषेत अनुवाद करण्याचे कार्य सुरू केले . सर्व मूळ त्रिपिटकांचे त्यांनी बौद्ध भिक्खू जगदीश कश्यप यांच्या मदतीने हिंदी भाषेत अनुवादित करून प्रसिद्ध केले . त्यांनी सर्व जातक कथांचे ६ खंड हिंदीत अनुवादित केले . ई. स. ४ थ्या शतकात श्रीलंकेत सिंहली भाषेत ' महावंश ' हा अत्यंत महत्त्वपूर्ण महाग्रंथ लिहिला गेला या सिंहली ग्रंथाचा सुद्धा त्यांनी हिंदी भाषेत अनुवाद केला . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ' द बुद्ध अँड हिज धम्म ' या इंग्रजी ग्रंथाचा त्यांनी हिंदी अनुवाद केला . त्यांनी स्वतःची २५ पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित केली . त्यांची काही पुस्तकं अभ्यासक्रमाला लावण्यात आली होती .
डॉ. भदंत आनंद कौसल्यायन हे एक भिक्खू असून सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान दिले आहे . महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विविध चळवळीत भाग घेतला आहे . १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनातील त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे . त्या करिता त्यांना तुरुंगवास सुद्धा झालेला आहे . स्वदेशीची चळवळ चालवून त्यांनी भारतीय तरुणांना ब्रिटिशांच्या विरोधात उतरविले आहे . भारतीय तरुण हा विवेकशील व तार्किक विचारांचा असावा यावर त्यांचा प्रामुख्याने भर होता व त्याप्रमाणे ते लेखन करत असत . डॉ. कौसल्यायन यांच्यावर सुरवातीस मार्क्स नंतर गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडतो , पण पुढं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत स्वतःला झोकून देतात. व शेवट पर्यंत त्याच चळवळीत काम करतात .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत झालेल्या एका चर्चे प्रसंगी बाबासाहेबांचा बौद्ध धर्मा विषयीचा असलेला प्रचंड अभ्यास बघून ते आश्चर्यचकित होतात . तेंव्हा ते बाबासाहेबांना " आपला बौद्ध धर्माचा एवढा प्रचंड अभ्यास हा बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतरचा आहे की , बौद्ध धर्म स्वीकारण्या करिताचा आहे "? असा प्रश्न करतात यावर बाबासाहेब दीलखुलास हसतात . बुद्ध मूर्ती विषयी बोलताना डॉ. कौसल्यायन मला सारनाथ येथील बुद्ध मूर्ती अधिक पसंत असल्याचे सांगतात तर बाबासाहेब " मला जनसेवा करतांना चालत असलेली बुद्ध मूर्ती अधिक पसंत आहे " ! असे सांगतात .
डॉ. कौसल्यायन यांनी सलग ६० वर्षे बौद्ध धर्माची चळवळ देश विदेशात चालवली . ते नागपूर शहराला सारनाथ म्हणून संबोधित असत . त्यांनी श्रीलंकेतील मुळ बोधिवृक्षाची फांदी भारतात आणून दीक्षाभूमी येथे लावली . त्यांचे बहुतांश कार्य विदर्भात राहिलेले आहे . बौद्ध धर्मा सोबत सोबत त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचारार्थ केलेले कार्य देशास नेहमी मार्गदर्शक ठरणारे आहे .
आधुनिक भारतातील बौद्ध धर्माच्या चळवळीत डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी दिलेले अतुलनीय योगदान हे कधीही विसरता न येणारे आहे . २२ रोजी जून त्यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
जयसिंग वाघ ( ९८८१९२८८८१ )