आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : हळद पिकाचा हमी भाव योजनेत समावेश करा :हळद उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान :

रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या हळद पिकाला व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर हळद पिकाचा शासकीय आधारभूत किंमत अर्थात हमी भाव योजनेत समावेश करावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

रावेर तालुक्यात हळद पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र मोठे असून दरवर्षी त्यात शेकडो हेक्टरने वाढ होत आहे. केळीची मक्तेदारी असलेल्या रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यांत केळीला पर्यायी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळत आहेत. या पिकातून शेतकरी एकरी सुमारे १७५ ते २२५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत.

मात्र, गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम हळदीचे उत्पादन होत असतानाही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जात नसल्याच्या असंख्य तक्रारी हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत होत्या. भावाबाबत व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या आर्थिक कोंडीमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून केंद्र किंवा राज्य शासनाच्या आधारभूत किंमत अर्थात हमी भाव योजनेत हळद पिकाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य व हमीभाव मिळून आर्थिक न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार जावळे यांनी हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाबद्दल रावेर-यावल परिसरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.