भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने पीएलव्ही रूपाली नेवे यांच्या समन्वयातून बालकांचे हक्क, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act) तसेच ‘बालविवाह मुक्त भारत’ या विषयांवर एकदिवसीय कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्या मंदिर, टिंबर मार्केट, भुसावळ येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी बालकांचे हक्क, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अशा घटनांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. प्रिया अडकमोलं यांनी POCSO कायद्यांतर्गत बालकांना मिळणारे संरक्षण, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यास घ्यावयाची खबरदारी आणि उपलब्ध कायदेशीर उपाययोजना याबाबत सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच ‘बालविवाह मुक्त भारत’ या महत्त्वपूर्ण विषयावर ॲड. पुरुषोत्तम पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. बालविवाहाचे दुष्परिणाम, त्यास प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच समाजाने या अनिष्ट प्रथेविरोधात सजग राहण्याची आवश्यकता यावर त्यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमास पीएलव्ही स्वाती भोळे यांनी कायदेविषयक पत्रकांचे वाटप करून सहकार्य केले. श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्या मंदिरातील इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कैलास तांबट सर यांनी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल लोणाग्रे यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क, POCSO कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती निर्माण झाली.



