शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा जागर अपरिहार्य – मंत्री संजय सावकारे ; शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा जागर; वांजोळा शाळेला लॅपटॉप-प्रोजेक्टर भेट ;
भुसावळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने जागर प्रतिष्ठान आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकारातून वांजोळा येथील जिल्हा परिषद शाळेला लॅपटॉप व प्रोजेक्टर भेट देण्यात आला. तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
याच उपक्रमांतर्गत भुसावळ तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील आणि नाशिक येथे तंत्रज्ञान विषयाचे उच्च शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यालाही लॅपटॉप भेट देण्यात आला. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपक्रमानिमित्त मंत्री संजय सावकारे यांनी वांजोळा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आजचे युग हे नवतंत्रज्ञानाचे असून त्यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून शिक्षक ती घडविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. मात्र संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल साधनांच्या अभावामुळे ही प्रगती अपूर्ण राहू नये, या हेतूने जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"विद्यार्थ्यांना बालपणापासूनच संगणक आणि लॅपटॉपसारख्या आधुनिक साधनांचा वापर करण्याची सवय लागल्यास देशाचे उज्ज्वल भविष्य अधिक वेगाने घडू शकते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत," असे प्रतिपादन मंत्री सावकारे यांनी केले.
उपक्रमासाठी पुणे येथील दीपक नाईक आणि मंदार पाठक यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव प्रा. निलेश गुरूचल, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवार, कायदे तज्ज्ञ अॅड. हरेशकुमार पाटील, संचालक पवन पाटील, जिल्हा परिषद शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
डिजिटल साधने ही काळाची गरज – अॅड. हरेश पाटील
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान हे शिक्षणाचे प्रभावी माध्यम बनले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत अॅड. हरेश पाटील यांनी व्यक्त केले.
‘AI’ विद्यार्थ्यांसाठी उद्याच्या जगाचे प्रवेशद्वार – प्रा. पंकज पाटील
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे केवळ तांत्रिक साधन नसून मानवी क्षमतांना नवी उंची देणारे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांत AI मुळे कार्यक्षमता वाढत असून भविष्याच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे संस्कार रुजणे आवश्यक असल्याचे मत जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पंकज पाटील यांनी व्यक्त केले.