भुसावळ विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता सप्ताहानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी)- 
आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील संरक्षा विभागामार्फत जनसामान्यांमध्ये रेल्वे फाटकांवरील सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये विभागातील वरिष्ठ शाखा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान रेल्वे फाटक ओलांडताना घ्यावयाची काळजी, बंद फाटकाखालून किंवा बाजूने जाण्याचे धोके, तसेच रेल्वे नियमांचे पालन करण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

यावेळी सहभागींकडून विविध घोषणांद्वारे रेल्वे फाटकांवरील सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. रेल्वे फाटकांवरील अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

भुसावळ मंडळाकडून रेल्वे फाटकांवरील सुरक्षिततेबाबत सातत्याने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.