भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न : सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा गौरव; शिक्षणासोबत अध्यात्म व करिअर नियोजनाचे महत्त्व अधोरेखित ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – : भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या लेवा समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार समारंभ रविवारी बी. व्ही. खाचणे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रेरणादायी कार्यक्रमास समाजातील शेकडो विद्यार्थी, पालक, आजी-आजोबा तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक ललितदादा पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. भरत महाराज बेळीकर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती देवी, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वर्गीय रमेशदादा पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात भुसावळ विभागाचे प्रमुख सुहासदादा चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, दहावी-बारावीत मिळालेले यश ही केवळ सुरुवात असून भविष्यात आणखी मोठी उद्दिष्टे गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प. भरत महाराज बेळीकर यांनी शिक्षणासोबत अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित केले. “अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणाला अध्यात्माची जोड दिल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होऊन ते जीवनात निश्चित यशस्वी होतात,” असे त्यांनी सांगितले.
भोरगाव लेवा पंचायतच्या समुपदेशिका सौ. आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन करताना, ध्येय निश्चित करताना केवळ एका पर्यायावर अवलंबून न राहता पर्यायी मार्गांचाही विचार करण्याचे आवाहन केले. एखाद्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही तरी आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी पर्यायी पर्याय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात भुसावळ, जळगाव, न्हावी, वरणगाव, खिरोदा, वराडवासीम, भालोद, खडका, चीनावल, सांगवी, यावल आदी परिसरातील सुमारे ३०० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पालक व आजी-आजोबांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे संचालक महेश फालक, सुभाष भंगाळे, हरीष फालक, शरद फेगडे, कावेरी चौधरी, संध्या वराडे, मंगला पाटील, अरुण पाटील, परीक्षित बऱ्हाटे, संजय पाटील, धीरज पाटील, अनिल वारके तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी डॉ. विजय भोजराज खाचणे, सुभाष प्रभाकर पाटील, विनायक शंकर पाचपांडे, निळू भारंबे, सुधीर पाटील, दिनेश भंगाळे, जगदीश फिरके, नितीन पाटील, निलेश भोळे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गौरवाने, प्रेरणादायी मार्गदर्शनाने आणि उत्स्फूर्त सहभागाने हा सत्कार सोहळा संस्मरणीय ठरला.