भुसावळात बकरी ईद उत्साहात साजरी; ईदगाहांवर हजारोंनी अदा केली नमाज

भुसावळ (प्रतिनिधी) – संपूर्ण देशासह भुसावळ शहरातही बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शहरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले नागरिक, अत्तराचा सुगंध दरवळवत ईदगाहकडे जाताना दिसत होते.

भुसावळातील मोठी आणि छोटी ईदगाह येथे सकाळी बकरी ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी शहरातील शहरे इमाम यांनी अत्यंत साधेपणाने, शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात नमाज पूर्ण केली. ईदगाह परिसरात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे सजदा करत अल्लाहची प्रार्थना केली.

नमाजनंतर शहरे इमाम यांनी खुतबा पठण करत देश आणि शहराच्या प्रगतीसाठी विशेष दुआ मागितल्या तसेच भुसावळ शहरात कायम अमन, बंधुभाव आणि शांतता नांदावी यासाठीही प्रार्थना करण्यात आली.

यावेळी शहरे इमाम यांनी ईदगाहच्या मंचावरून भुसावळ नगर परिषद तसेच पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले. स्वच्छता व्यवस्था, सुरक्षेचे नियोजन आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे हा सण अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

नमाज संपल्यानंतर ईदगाह परिसरात नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भुसावळची संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.